कळंबस्ते फाटा ते धामणंद रस्त्यावरील खड्ड्यांवर फटाके वाजवून दिवाळी साजरी
खेड सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

चिपळूण : कळंबस्ते फाटा ते धामणंद रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे कानाडोळा केल्याने यंदाची दिवाळी खड्ड्यात फटाके वाजवून साजरी करण्यात आली. जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर आवाज जाईल. यानंतरही जर खड्डे ताबडतोब भरले नाहीत, तर पुढील फटाके संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाजवले जातील, असा स्पष्ट इशाराही माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला.
कळंबस्ते फाटा ते धामणंद या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, स्थानिक नागरिकांनी याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा रस्ता खेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून, अनेक वेळा दुरुस्तीची मागणी केली असतानाही तो दुर्लक्ष केला गेला आहे. माजी सभापती शौकत मुकादम यांनी पुढाकार घेत खड्ड्यात फटाके वाजवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल (२०ऑक्टोबर) सकाळी १० वाजता कळंबस्ते पेठ येथे या रस्त्यावरील खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली.
या वेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडिक, शिरीष शिंदे, दीपक शिगवण, पांडुरंग पिलावरे, हभप चव्हाण बुवा, हळदे, अमेय महाडिक, सौरभ महाडिक, विकास जोरवेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिक पुढील आंदोलनात्मक पाऊले उचलतील, असा इशारा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिला.



