कोकणातील नैसर्गिक संपत्तीला जागतिक बाजारपेठेची जोड द्या : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
शेतकरी व नवउद्योजकांसाठी विशेष निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरीच्या भूमीत निसर्गाने आंबा, काजू, फणस आणि समृद्ध सागरी संपत्तीचे भरभरून देणे दिले आहे. या स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधुनिक प्रक्रिया, दर्जेदार पॅकेजिंग आणि योग्य मूल्यवर्धन केल्यास जिल्ह्यातील शेतकरी व नवउद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली होऊ शकतात, असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषी, फलोत्पादन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील वृद्धी व निर्यातीला गती देण्यासाठी ‘एक्झिम बँक’ (EXIM Bank) आणि ‘जिल्हा उद्योग केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, मायकल डेल यांच्याप्रमाणे आजच्या तरुणांमध्ये शून्यातून मोठे साम्राज्य उभे करण्याची उद्योजक वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. छोट्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनांचे प्रमाणीकरण (Scaling) आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकेजिंग या त्रिसूत्रीच्या आधारे स्थानिक उत्पादने सातासमुद्रापार पोहोचवणे सहज शक्य आहे. फणसाच्या वाढत्या जागतिक मागणीचा वेध घेत पावडर, औषधी घटक आणि ‘व्हेगन लेदर’सारख्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करणारे ‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांच्या कार्याचा त्यांनी विशेष गौरव केला.
जिल्ह्यात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रत्यक्ष कृतीत आणले जात असून, ‘राईट टू सर्व्हिस’ कायदा आणि ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे उद्योगांशी निगडित आवश्यक दाखले अवघ्या २० दिवसांत उपलब्ध करून दिले जात आहेत. एक्झिम बँक व इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने आर्थिक पाठबळ, कर्जसुविधा आणि निर्यात धोरणांचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने जिल्ह्यातील तरुणांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त अजिंक्य आजगेकर यांनी केले. त्यांनी शासकीय निर्यात धोरणे आणि उद्योजकांसाठी उपलब्ध विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर रूपरेषा मांडली.
या कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, एक्झिम बँकेचे उपमहाव्यवस्थापक रविदास प्यागे, वॉलमार्ट वृद्धीचे अनिष प्रधान, हेमेंद्र म्हात्रे, रुवान फुट टेकचे निनाद पाटील, इंडिया पोस्टचे गजानन करमरकर तसेच ‘जॅकफ्रूट किंग अॅग्रो’चे मिथिलेश देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी व भावी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



