मुख्य बातमी

पॅरोलवरून फरार झालेला कैदी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद

रत्नागिरी : खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि एक महिना पॅरोल रजेवर बाहेर आलेला कैदी गेल्या मागील नऊ महिन्यांपासून फरार होता. हा कैदी नवी मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल (२० जून) न्याय बंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय ३३वर्षे, रा. घर नं १७, कस्टोडिया दियाम, लयामती दावोलींम, सालसेट, गोवा राज्य, मूळ रा. कुमाटगी गाव, विजापूर जिल्हा, कर्नाटक राज्य) याला नवी मुंबई येथून ताब्यात घेतले असून, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमधील कारागृहातून संचित रजा भोगत असलेल्या परंतु विहित मुदतीत हजर न झालेल्या न्याय बंदी व पाहिजे असलेले आरोपी यांची शोध व अटक मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत जिल्ह्यातील फरार न्याय बंदी व पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

मरगाव शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३३२/२०११ भा.दं.वि.सं. चे कलम ३०२, ३६४, २०१ अन्वये मध्यवर्ती कारागृह, कोलवाड, तालुका बारदेस, जि. नॉर्थ गोवा येथे खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला न्याय बंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार याला अपर पोलीस महासंचालक, कारागृह पणजी, राज्य गोवा यांनी ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ अशी एकूण ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. या पॅरॉल रजेच्या कालावधीमध्ये न्याय बंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार हा रत्नागिरी मध्ये रहिवास करणार होता. तसेच त्याला आपली पॅरॉल रजा उपभोगून ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या पूर्वी मध्यवर्ती कारागृह, कोलवाड, तालुका बारदेस, जि. नॉर्थ गोवा या ठिकाणी स्वतःहून हजर राहणे आवश्यक होते.

परंतु आपली संचित रजा उपभोगून तो विहित मुदतीत गोवा येथील कारागृहात हजर न झाल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार न्यायबंदी हा मागील ९ महिन्यांपासून मिळून येत नव्हता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास या गुन्ह्यातील फरार न्याय बंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार हा नवी मुंबई या ठिकाणी वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २० जून रोजी २०२५ रोजी न्याय बंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार याला नवी मुंबई येथून ताब्यात घेवून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे हजर केले.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पो.हवा विजय आंबेकर, पो.हवा दिपराज पाटील, पो.हवा विवेक रसाळ, चा.पो.कॉ अतुल कांबळे यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!