हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना मनसे कडाडून विरोध करणार

खेड : हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही प्रयत्नांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कडाडून विरोध करणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा लढा निर्णायक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. मराठी भाषेचे प्रेम आणि अभिमान जपण्यासाठी खेडमधील शाळांना पत्र वितरणाची मोहीम मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड तालुकाध्यक्ष निलेश बामणे, शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, मनविसे खेड तालुका सचिव स्वरूप माजलेकर, अभिजीत कदम, उदय उर्फ पप्पू गुहागरकर, प्रदीप भोसले, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष हिंदुजननायक राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी व्यक्त केलेल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि शाळांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावे यासाठी ही पत्रे विपरीत केली आहेत. पत्र वितरणाबरोबच शाळामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत चर्चा घडवून आणण्याचेही या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मनसेने यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी विविध आंदोलने केली असून, या मोहिमेद्वारे मराठी अस्मितेचा आवाज आणखी बुलंद करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. ही मोहीम राज्यभरातील विविध तालुक्यामध्ये पुढे राबवली जाणार असून, मराठी जनतेला एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.



