महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार असून, एकूण सुमारे एक महिन्याचा कालावधी असेल. कांदा, धान, सोयाबीन, कापूस आदी प्रश्न या अधिवेशनात गाजण्याची शक्यता असून विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारीत आहेत.

या अधिवेशनात राज्याचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावर सर्व पक्षांच्या आमदारांची चर्चा होईल आणि अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ आणि नियोजन खाते स्वतःकडे घेतले आहे.) विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल अर्थसंकल्प मांडतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अधिवेशनात प्रथमच उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी भावनिकपणे अजित पवार यांची आठवण काढली.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्याने ३२ तास वाहतूक बंद पडणे, मुलुंड येथे मेट्रोच्या कामाचा भाग कोसळणे अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना या अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कापूस, धान, कांदा, सोयाबीन असे कृषी विभागाशी संबंधित विषय चर्चिले जातील. गेल्या वर्षी अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत जाहीर करण्यात आली असली तरी ही मदत शेतकर्‍यांना मिळालेली नाही. २०१७ च्या कर्जमाफीचा लाभ अद्याप सर्व शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यावरून विरोधी पक्ष सरकारला जाब विचारणार आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर जून महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!