पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा ‘भात लावणी’ उपक्रम; कृषी संस्कृतीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा ‘भात लावणी’ उपक्रम; कृषी संस्कृतीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव
रत्नागिरी : मातीशी नाळ जोडणारा आणि कृषी संस्कृतीची ओळख करून देणारा एक अनोखा उपक्रम नुकताच पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथे इयत्ता आठवीच्या १२० विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवत ‘भात लावणी’चा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
दिनांक १४ व १५ जुलै रोजी आयोजित या दोन दिवसीय शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांसोबत ८ शिक्षक उपस्थित होते. केवळ भात लावणीच नाही, तर कृषी संशोधन केंद्रातील विविध आधुनिक संशोधन पद्धतींची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. चिखलात उतरून भाताची रोपे लावताना विद्यार्थी भारावून गेले होते. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन शेतीतील कष्टाची आणि आनंदाची प्रचिती त्यांना या उपक्रमातून आली.
या उपक्रमासाठी कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. निलेश गोविंदराव सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडला. केंद्राचे कृषी सहाय्यक राजेश दीपक सावंत आणि अजय शंकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना चारसुत्री लावणीच्या योग्य पद्धती समजावून सांगितल्या. विशेष म्हणजे, पटवर्धन स्कूलचे माजी विद्यार्थी श्री. स्वरूप प्रदीप भाटकर आणि राजू शिरगावकर यांनीही या उपक्रमात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची, पिण्याच्या पाण्याची, उत्तम व्यवस्था केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत. कृषी संशोधन केंद्राच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडली असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना शाळेतर्फे व्यक्त करण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक कौस्तुभ पालकर, उमेश दिवटे, संकेत पाडाळकर, धनाजी साळुंखे, कल्पना शिरोळकर, प्रीती केळकर, अक्षया भाटकर, पुनम काटकर, यांनी प्रयत्न केले. उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर तसेच मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरील उपक्रम यशस्वी करण्यात आला.



