आरे-वारे पॉईंट येथे पर्यटकांची गाडी कोसळली खाली
मोठी दुर्घटना टळली; मात्र वाहनाचे नुकसान

रत्नागिरी : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या तालुक्यातील आरे-वारे पॉईंट येथे उभी करून ठेवलेली चारचाकी गाडी पावसाने निसरड्या झालेल्या उतारावरून थेट शंभर ते दीडशे फूट थेट खाली समुद्रात कोसळली. गाडीतील पर्यटक फोटो काढण्यासाठी गाडीच्या बाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली; मात्र या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना काल (२८ मे) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सांगली येथील दोन पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी रत्नागिरीत आले होते. आरे-वारे येथील पॉईंटनजीक आल्यानंतर या पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडी समुद्राच्या दिशेने पार्क केल्यानंतर या दोघा पर्यटकांनी फोटो काढण्यास सुरुवात केली; मात्र याचवेळी गाडी अचानक समुद्राच्या बाजूने झुकली अन् क्षणार्धात आरे वारे पॉईंटवरून थेट शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळली.
गाडी समुद्रात कोसळताच जमलेल्या पर्यटकांनी एकच गोंधळ सुरू केला. या दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी येथील पोलीस पाटील आदेश कदम यांना दिली. शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळलेली चारचाकी गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत मागवण्यात आली. स्थानिकांच्या सहकार्याने आणि क्रेनच्या मदतीने कोसळलेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.



