सृजन सायन्स सेंटर येथे संगमेश्वर विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा संपन्न
इन्स्पयार अवॉर्ड मानक या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवण्याबाबत मार्गदर्शन

संगमेश्वर : तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळांमध्ये अध्यापन करत असणाऱ्या विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा गुरुवारी देवरुख येथील सृजन सायन्स सेंटर येथे संपन्न झाली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, केंद्रप्रमुख श्री. करंबेळे यावेळी उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकातून श्री. मेंगाळ यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. तर श्री. त्रिभुवने यांनी आपल्या मार्गदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी इन्स्पायर अवॉर्डसारख्या राष्ट्रीय मंचाचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. श्री. भागवत यांनी शिक्षकांनी सृजन सायन्स सेंटरचा लाभ ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा असे आवाहन करतानाच पहिली ते बारावीपर्यंत सर्व वैज्ञानिक प्रयोगांची सेंटर मध्ये उपलब्धता असल्याने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक सत्रात किमान एकदा अशी वर्षातून दोनवेळा येथे भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त केली.
यानंतर साधन व्यक्ती म्हणून योगेश मुळे,अजिंक्य नाफडे, संदीप जाधव, अमृत मेंगाळ यांनी योजनेमागील उद्देश, तांत्रिक बाबी तसेच नामनिर्देशन करण्याबाबत माहिती दिली. अनेक शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.


