मुख्य बातमी

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी, देवरुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान

रत्नागिरी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्ताने रत्नागिरी व देवरुख शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पद्मभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानातून नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रेरित व्हावे हा मुख्य उद्देश असून, श्रमप्रतिष्ठेतूनच राष्ट्र आणि समाज उभारणीचे कार्य होणार आहे. स्वच्छता हा आपल्या प्रत्येक नागरिकांचा संस्कार बनावा. यासाठीच धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नेहमीच स्वच्छता अभियान घेण्यात येते.

आज महाराष्ट्रामध्ये व्यापक अर्थाने स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी व देवरुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रत्नागिरी व देवरुख शहर बाजारपेठ अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यात आले. रत्नागिरी शहरामध्ये १२९१ किलो ओला कचरा, तर ४८११ किलो सुका कचरा तसेच देवरुखमध्ये ४५० किलो ओला कचरा व १२०० किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता अभियानामध्ये ७३८ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता.

या स्वच्छता अभियानामध्ये रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेवक नितीन जाधव, राजू तोडणकर, राकेश नागवेकर, स्मितल पावस्कर यांनी सहभाग घेतला होता.

रत्नागिरी शहरामध्ये व्यापकपणे घेतलेल्या स्वच्छता अभियानाबद्दल बोलताना रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सुर्वे म्हणाल्या की, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने नेहमीच रत्नागिरी शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि शहरातील रस्ते स्वच्छ बनले आहेत. त्याबद्दल मी धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि डॉ. आप्पासाहेब व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल रत्नागिरी व देवरुख शहरांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!