रत्नागिरीचे ॲड. सागर कळंबटे यांचे कबड्डी राष्ट्रीय पंच परीक्षेत यश

रत्नागिरी : राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचे सुपुत्र ॲड.सागर शिवाजी कळंबटे हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून लक्ष्मीकांतवाडी मिरजोळे येथून रत्नागिरीचा हा हिरा आत्ता कबड्डीचा राष्ट्रीय पंच म्हणून देशासाठीची जबाबदारी आता निभावणार आहे.
कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीला झालेली सुरवात आणि त्या नंतर अनेक स्पर्धांचे कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजन करत असताना प्रथम २०१९ मध्ये जिल्हा पंच म्हणून परीक्षा दिली आणि जिल्हा पंच म्हणून अनेक स्पर्धा पार पाडतानाच आपला वेगळा ठसा या स्पर्धामध्ये उमटवीला. त्यानंतर मात्र मागे वळून न बघता २०२२ मध्ये राज्य आणि यावर्षी २०२६ मध्ये राष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन रत्नागिरीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याचे काम ॲड. कळंबटे यांनी केले आहे.
गेल्या ७ वर्षांत अनेक तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करतानाच राज्य पंच म्हणून सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी चाचणी स्पर्धा व कबड्डी स्पर्धामध्येही पंच म्हणून ॲड. सागर कळंबटे यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे.
“आता या पुढे देशासाठी पंच म्हणून जबाबदारी आहे आणि ती उत्तमरित्या पार पाडून कोकणचे नाव सर्व देशात करणार आहे आणि संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण जगात कोकणचे नाव पोहोचवायचे आहे आहे,” अशी प्रतिक्रिया ॲड. कळंबटे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धा मध्ये पंच म्हणून पाहण्याची संधी समस्त कोकणवासियांना ॲड. कळंबटे यांच्या रूपात या पुढे मिळणार आहे आणि याच उत्तुंग यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


