सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामात सहभागी होण्यासाठी शेवटचे १५ दिवस शिल्लक
जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमधील भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना लागू

रत्नागिरी : या वर्षीचे अल-निनोचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव व विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उत्पादनामध्ये घट झाल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. खरीप हंगाम २०२६ च्या या योजनेत सहभागी होण्यासाठी आता शेवटचे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत.
योजनेचे निकष आणि शेतकऱ्यांचा सहभाग:
लागू पिके व क्षेत्र: रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांकरिता भात व नाचणी या पिकांसाठी ही योजना लागू आहे. योजनेत शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे.
सहभाग ऐच्छिक: सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही यात भाग घेण्यास पात्र असून, त्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या गरजा: योजनेत सहभागी होण्यासाठी ‘AGRISTACK’ शेतकरी ओळख क्र. असणे अनिवार्य आहे. तसेच, डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ‘ई-पीक पाहणी’ नोंद करणे बंधनकारक राहील. विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणीतील पिकात तफावत आढळल्यास, ई-पीक पाहणीत नोंदविलेले पीकच अंतिम गृहीत धरले जाईल.
विमा हप्ता व भरपाई मर्यादा: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता २ टक्के असून, जोखीमस्तर अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के आहे.
भात पीक: हेक्टरी ६,५००/- रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. (०.१० हेक्टर क्षेत्राकरिता शेतकऱ्याने ६५/- रुपये हप्ता भरणे आवश्यक).
नाचणी पीक: हेक्टरी ४,०००/- रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. (०.१० हेक्टर क्षेत्राकरिता शेतकऱ्याने ४०/- रुपये हप्ता भरणे आवश्यक).
अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची तारीख:
योजनेत सहभागी होण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ आहे. पीक कर्ज घेतलेल्या बिगर कर्जदार शेतकऱ्याला विमा योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास, त्याने अंतिम दिनांकाच्या आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.
इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणा पत्र घेऊन अधिकृत बँकेत विमा अर्ज द्यावा व हप्ता भरून सहभाग घ्यावा. तसेच हप्ता भरलेली पोहोच पावती जपून ठेवावी. शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांच्या मदतीने अथवा स्वतः www.pmfby.gov.in या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
विमा संरक्षण आणि तांत्रिक बाबी:
योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे/तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. (उदा. ऑक्टोबर २०२५ मध्ये पीक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती.)
या योजनेसाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी ली. यांची नियुक्ती करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी supportagri@iffcotokio.co.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या खरीप पिकांचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.



