पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी

रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बावनदी, वांद्री, संगमेश्वर या विविध ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. जेथे खड्डे आहेत, त्या ठिकाणी तातडीने खड्डे भरावेत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पुढील शनिवारी पुन्हा या रस्त्याची पाहणी करून आढावा घेणार असल्याचे सांगितले.

काहीजण मुंबई-गोवा महामार्गाबाबत गैरसमज पसरवत आहेत. म्हणून मी स्वतः रत्नागिरीपासून चिपळूणपर्यंत संपूर्ण रस्त्याची पाहणी अधिकाऱ्यांसह केली. हा एकूण रस्ता ३५५ किमीचा असून, त्यातील ३३४ किमी म्हणजेच ९३.१८ टक्के काम पूर्ण झाले आहे. आरवली ते कांटे प्रलंबित (फक्त २० टक्के काम बाकी), उर्वरित २१.१९ किमी मध्ये साडेचार किमी डबल लेन काम पूर्ण व्हायचे आहे.
“आज मुद्दाम खड्डे असलेल्या ठिकाणी थांबलो, पाहणी केली. जेव्हा ही साडेचार किमी डबल लेन पूर्ण होईल, तेव्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास जाईल,” असे यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले.



