गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात यावर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त १० जुलै रोजी विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळपासूनच श्री गुरुदेवांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ पूजन, चरणांवर अभिषेक, तसेच श्री गुरूचरणांचे पूजन यांसारख्या विधींना सुरुवात होईल. त्यानंतर उपस्थित भक्तगणांकडून भावपूर्ण स्तुती व नामस्मरण केले जाईल.
दुपारी श्री गुरुदेवांचे मार्गदर्शन, महानैवेद्य अर्पण, महाआरती, महाप्रसादाचे वितरण आणि गुरूंच्या चरणांचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ६.३० वाजता मठामध्ये विशेष दीपोत्सव सोहळा पार पडणार असून, त्यामध्ये प्रत्येक भक्ताने किमान एक दिवा किंवा अधिक दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दीपोत्सववाचा उद्देश असा की, प्रपंचातील अडचणी, अंधाररूपी दु:ख आणि दारिद्र्य दूर होऊन प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदावी. त्यामुळे हा दीपयज्ञ श्रद्धेने आणि संकल्पपूर्वक साजरा केला जाणार आहे. एका दिव्यासाठी सेवा शुल्क १० रुपये इतके असून, दीपदानासाठी इच्छुक भक्तांनी आपले नाव मठात नोंदवावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या संपूर्ण उत्सवात सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ व सद्गुरूंच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठ समितीने सर्व स्वामीभक्तांना केले आहे.



