कोणत्याही परिस्थितीत शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही
महायुतीच्या निर्धार मेळाव्यात सामंत, चव्हाण यांचा बंडखोरांना इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने (शिंदे शिवसेना आणि भाजप) आज (१९ नोव्हेंबर) हॉटेल विवेक येथे आयोजित निर्धार मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे महत्त्व स्पष्ट केले, कोणत्याही परिस्थितीत शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असे ठणकावून सांगत उमेदवार आणि कार्यकर्त्यांना थेट आणि कठोर शब्दांत इशारा देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात कोणताही थारा दिला जाणार नाही, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. जो कोणी आमचा पदाधिकारी असू दे, कार्यकर्ता असू दे, माझं नाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे, यांची गय केली जाणार नाही. जो माझ्या पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्यानंतर पुढची चार वर्षं पालकमंत्री म्हणून त्यांना माझ्याबरोबर संसार करायचा आहे.”
“महायुतीविरोधात काम करणाऱ्यांना पालकमंत्री म्हणून त्यांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळणार नाही. त्यांनी नगराध्यक्ष उमेदवारांना ‘मलाच मत द्या’ अशी स्थानिक स्वार्थाची भूमिका बाजूला ठेवा, कारण ती महायुतीसाठी घातक ठरू शकते,” असे सामंत यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बंडखोरांना अर्ज मागे घेण्याची विनंती करतानाच, कार्यकर्त्यांना नात्यांमध्ये अडकून न पडण्याचा सज्जड इशारा दिला. त्यांनी थेट राजेश सावंत यांचा उल्लेख करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “रत्नागिरीत महायुतीमध्ये नाती आड येताना दिसत आहेत; परंतु नात्यांमध्ये अडकून पडू नका, नाहीतर गडबड होईल. राजेश सावंत हे आता भाजपा पक्षाचा कोणताही भाग नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोणाचा “स्टेट्स” काय आहे, हे पाहण्याची गरज नाही.”
वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेला युतीचा निर्णय ‘मनामध्ये कोणताही परंतु-किंतु न ठेवता’ मान्य करून, महायुतीचे प्रामाणिक काम करण्याची जबाबदारी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांवर सोपवली.
चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना ही निवडणूक ‘कार्यकर्त्यांची निवडणूक’ असल्याचे सांगून, दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘धनुष्यबाण आणि कमळ’ प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाल्यासच केंद्र-राज्यातील निधी चांगल्या प्रकारे आणता येईल. जर चुकून विरोधकांचा उमेदवार निवडला गेला, तर सत्तेत नसताना निधी मिळणे फार कठीण होते आणि नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असे चव्हाण यांनी सांगितले.
कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले रोजगार धोरण यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करत असून, लवकरच एमआयडीसीकडून प्रकल्प येऊन दहा-पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.
या मेळाव्यास उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, भाजपचे जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन, वैभव खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजपचे नेते प्रशांत यादव, रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.


