मुख्य बातमी

रत्नागिरी शहर पोलिसांकडून ३०० ग्रॅम गांजा जप्त; नेपाळी तरुण ताब्यात 

रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार मांडवी, पेठकिल्ला परिसरात गस्त घालत असताना मिरकरवाडा जेटीच्या बाजूला असलेल्या पडीक बोटीच्या कॅबिनजवळ एक तरुण आपल्या पाठीमागे हिरव्या रंगाची सॅक लावून संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडून ३०० ग्रॅम गांजा आणि इतर असा एकूण १४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहनसिंग रामचंद्र भाट (वय २६, मूळ रा. गाव भाटेश्वर, जिल्हा डडेल्धुर, राज्य-नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, ता. जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या कठोर सूचनांनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवायांत यश मिळवले आहे.

१४ नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना मोहनसिंग भाट हा संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या सॅकबद्दल चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी स्वतः दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली.

या झडतीदरम्यान, मोहनसिंग भाट याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता, त्यातील मधल्या कप्प्यामध्ये ३०० ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अमली पदार्थ काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण १४ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहनसिंग भाट यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब) ii (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मोहनसिंग भाट याच्यावर यापूर्वीही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४१९/२०२४ अन्वये अमली पदार्थांसंबंधी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. भाट याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!