महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यात पावसाचा हाहा:कार; कशेडी घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली

मुंबई : गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे परिसरात दरड कोसळली होती. यानंतर आता दुसऱ्या दिवशी सोमवारी कशेडी घाटातील नव्या महामार्गावर दरड कोसळली आहे.

परशुराम घाटाच्या जवळ असलेल्या ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरातील माती महामार्गावर यायला सुरुवात झाली आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे. याशिवाय, रायगड जिल्ह्यात खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नदीने धोका पातळीच्या वर वाहत आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असून अनेक गाड्या गेल्या 10 ते 12 तासांपासून अडकून पडल्या आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर मोठी दुर्घटना घडली आहे. मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळून त्यामधून पाण्याचा लोंढा आणि माती आत शिरली. हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणावळा परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे मुंबई पुणे घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नव्या आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे.. मुसळधार पावसाचा फटका दक्षिण रायगड मधील महाड शहराला बसलाय. कारण महाड शहराच्या बाजूने वाहणारी सावित्री नदीने धोका पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केल आहे. सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा महाड शहरासह आजूबाजूच्या शेतीला बसला असून महाड शहरातील अनेक बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!