पिरंदवणे नं. १ शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

संगमेश्वर : तालुक्यातील जि.प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे भारतीय संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. उपशिक्षक कुलदीप देशमुख यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य विषद केले. पदवीधर शिक्षक योगेश मुळे यांनी ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ या संदेशावर प्रकाश टाकत आदर्श नागरिक होण्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षण असल्याचे मत व्यक्त केले. आपले हक्क, मागण्या सनदशीर व संवैधानिक मार्गानेच सरकारपुढे मांडाव्यात तरच शांतता व सुव्यवस्था राखली जाईल हे स्पष्ट करताना त्यांनी विविध राष्ट्रपुरुषांची उदाहरणे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ५ वीतील आर्या काजरेकर हीने केले. उपशिक्षक सचिन इंगळे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.



