राष्ट्रहितैषी दृष्टे राष्ट्रपुरुष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी म्हणायचे की, तुम्हाला एका वर्षाची बिदागी हवी असल्यास, धान्य पेरा ! शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास, माणसे पेरा। आणि पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास, विचार पेरा।’
आजपर्यंतच्या इतिहासात ज्यांनी जातीयवादी राजकारण सत्ताकारण केले, त्यांनी कधीही शेतात जाऊन धान्य पेरले नाही किंवा माणसंही पेरली नाहीत. फक्त त्यांनी बहुजन जनतेच्या मेंदूत जातीयवादी विचार पेरलेत, म्हणूनच ते सर्वसामान्य लोकांवर ५ हजार वर्षांपासून सर्वकष सत्ता गाजवित राहिले. आपला मेंदू गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होण्यासाठी वाचन, लेखन, चिंतन करायला भाग पाडणारे शिक्षण दिले पाहिजे; परंतु ज्यांना इतरामध्ये बसण्याची, उठण्याची, वावरण्याची परवानगी नव्हती. ज्यांना मान वर करण्याची मानसिकता नव्हती; मागील पाच हजार वर्षांपासून, ज्यांना फक्त मान खाली घालून जगण्याची परवानगी होती. ते काय वाचणार, लेखन करणार, चिंतन करणार? कोणत्या शाळेत जाऊन ते शिक्षण घेणार? पण – मानवसमाजाच्या जीवनाचा जेव्हा तोल ढळतो, माणुसकीची तत्त्वे पायदळी तुडविली जातात, न्याय-नीतीची चाड राहत नाही, माणसाचे माणुसपण हरवून तो राक्षसाप्रमाणे वागू लागतो, तेव्हा मानवसमाजाचा ऱ्हास होऊ लागतो अशा समाजाला सावरण्यासाठी, माणसांतील माणूस जागा करण्यासाठी, झालेला अन्याय दूर करून संपूर्ण मानवसमाजाला ‘तिमिराकडून तेजाकडे नेण्यासाठी महामानवाचा जन्म होतो. दुःखाने पोळलेल्याच्या आक्रोशाने तो दुःखी होतो, स्वतः वेदना, कष्ट सहन करीत चालत राहतो. असाच महामानव, महापुरुष, महात्मा, एक दृष्टा राष्ट्रपुरुष म्हणून संपूर्ण जगाने ज्याची नोंद घेतली (नव्हे घ्यावी लागली) ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
शतकानुशतके समाजात मानसिक गुलामगिरी रुजली होती. माणूस आपल्याच बांधवांना दूर लोटीत होता. त्याविरुद्ध मानवमुक्तीचा लढा देऊन सभा, संमेलने, परिषदा भरवून या महामानवाने दलित बांधवावर होणाऱ्या अत्याचाराला, अन्यायाला वाचा फोडली. स्वतः ला श्रेष्ठ समजणाऱ्या सर्व समाजाच्या गुलामगिरीतून, दलित बांधवासहीत संपूर्ण मानवजातीला मुक्त करण्यासाठी कोणत्याही मान – मरातबाशिवाय, कोणतेही पद – सन्मानाची अपेक्षा न ठेवता आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. आपल्या दूरदृष्टीने भारतातील प्रत्येक वर्गासाठी योग्य नियोजन करून चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदीर-प्रवेश, मनुस्मृतीचे दहन, धर्मातर, हिंदू-कोड बील, भारतीय राज्यघटना इ. बाबींचे माध्यमातून दलित बांधवांची अस्मिता माणि स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य केले.
डॉ. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. त्याचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. अत्यंत हुशार, कर्तबगार अशा या मुलावर केवळ जन्मामुळे तत्कालीन समाजाने अस्पृश्य जातीतील मुलगा असा शिक्का मारला होता. शाळेत, महाविद्यालयात आणि भावी कर्तबगारीच्या काळातही या शिक्क्याने त्यांचा अनेकदा मानभंग करून तेजोभंग करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या रास्त हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आर्थिक साहाय्य केले व ते बी. ए. झाले. परदेशात जाऊन अर्थशास्त्र या विषयात एम. ए., पीएच. डी., मिळवित बॅरिस्टर झाले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” असा त्यांनी कानमंत्र दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे व्यथित झाले. भीमरावांनी समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. डॉ. बाबासाहेबांसमोरचे काम फार अवघड होते. आपल्या निद्रिस्त समाजाला त्यांना जागे करायचे होते. त्यांची अस्मिता फुलवायची होती. जुन्या बुरसटलेल्या रुढींचे पाश तोडावयाचे होते. त्यासाठी डॉ. आंबेडकर त्या मुकसमाजाचे नायक झाले. त्यांनी आपल्या आशिक्षित बांधवांना संदेश दिला “वाचाल तर वाचाल”. त्यांच्यासाठी वसतिगृहे स्थापन केली, महाविद्यालये, वाचनालये काढली, रात्रीच्या शाळा भरविल्या, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालविले. अशा कार्यावर त्यांनी आपली शक्ती लावली. सगळ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय या संस्था काढल्या व जोमाने नावारूपास आणल्या. परिणामी या दोनही संस्थातून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेबांना कल्पना होती की, संपूर्ण समाज शिकला पाहिजे, वाचला पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षणाविषयी समाजात जागरुभता निर्माण केली. आपल्या बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
यानंतर बाबासाहेबांनी हा प्रश्न संपूर्ण जगासमोर मांडला. गोलमेज परिषदाच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रकांड पांडित्याने, प्रखर बुद्धिवादाने अखंड परिश्रमाने भारतातील दलित समाजाची करुण स्थिती, आणि दैन्यावस्था संपूर्ण जगाला जाणवून दिली. ही परिस्थिती संपूर्ण जगासमोर आणण्यामागे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दृष्टेपण होते. जर ही परिस्थिती इंग्रजांच्या देशात कळली तर, त्यावर काहीतरी उपाययोजना केली जाईल. आणि घडले ही तसेच या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने दलित तरुणांना सैन्य, पोलिस व इतर ठिकाणी नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. या सर्व घडामोडीमुळे अनेक वृत्तपत्रे, देशभक्त लोकांना आपल्या समाजावरील अपृश्यतेच्या कलंकाची जाणीव होऊ लागली. त्याला कारण होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ते सतत एका भूमिकेवर ठाम राहिले, माझ्या दलित बांधवाच्या हिताविरुद्ध असलेली कोणतीही योजना मी मान्य करणार नाही आणि ही भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली.
मुळात डॉ. बाबासाहेबांनी इतिहास घडविला म्हणजे नेमके काय केले? या प्रश्नाचे उत्तर वरील वाक्यात आहे. बाबासाहेबांच्या आधी हा समाज मुका होता. व्यवस्थेने त्याच्या हातातली लेखणी हिसकावून घेतली होती. त्याचा गाता गळा चिरण्यात आला होता. डॉ. बाबासाहेबांनी या मुळ समाजाचे नायकत्व स्विकारले. नष्टप्राय झालेल्याच्या अस्तित्वासाठी लढे पुकारले. त्यामुळे प्रत्येकालाच एक नवी ऊर्जा मिळाली म्हणूनच संपूर्ण राष्ट्राचे ते दृष्टे राष्ट्रपुरुष होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टेपणाची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. डॉ. बाबासाहेबांना पत्रकार घटनाकार, अर्थतज्ञ, संसदपटू, वक्ते, लेखक, विचारवंत, तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादी ही व अशी अनेक पैलू लागू पडतील. ते जेव्हा १९४२ ते १९४६ या काळात देशाचे ऊर्जा व जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने त्यांनी पुढील १०० वर्षे अविरत प्रकाश आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी चिंतन, नियोजन आणि उपाययोजना करीत होते. इ. स. २००० पर्यंत देशाला किती वीज आणि पाणी लागेल याचा अभ्यास करून त्यासाठी दूरदृष्ट्रीने त्यांनी मंत्री म्हणून पावले उचलली. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, पर्यटनासाठी व जलवाहतुकीसाठी लागणारे पाणी साठवायचे कसे व पुरवायचे कसे याचे शास्त्रशुद्ध नियोजन त्यांनी केले होते. (याठिकाणी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की, जर तत्कालीन राजकीय इच्छाशक्तींनी हे नियोजन स्विकारले असते तर आज ‘सिंचनासाठी ७० हजार कोटी वापरले कुठे? व तेवढे वापरूनही फक्त ०.०५% सिंचनाचे काम का झाले ? असे प्रश्न कुणीही विचारले होते नसते. शिवाय या देशातील लाखो जनता पाव्याविना तडफडताना दिसली नसती. असो) आपल्या देशांमध्ये काही राज्यांमध्ये महापूर आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला काही राज्यांमध्ये दुष्काळ पडलेला असतो. यावर उपाय म्हणून डॉ आंबेडकरांनी ‘नद्याजोड’ प्रकल्पाची संकल्पना मांडली होती; परंतु राजकीय इच्छाशक्तीपुढे हाही प्रकल्प फक्त कागदावरच राहिला. (आणि त्याचे परिणाम मात्र आजही आपण भोगत आहोत) परंतु आता या प्रकल्पाचे महत्त्व समजून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला याविषयीचे आदेश दिले आहेत. म्हणजेच यावरुन बाबासाहेब हे सगळ्यात महान दृष्टे राष्ट्रपुरुष ठरतात. ज्यांच्या अनेक दृष्टेपणापैकी एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ऊर्जानिर्मितीसाठीचे प्रकल्प १९५३ साली त्यांनी आपले मत मांडताना म्हटले की, मुबलक व स्वस्त वीज-पुरवठा असल्याखेरीज उद्योगाची भरभराट होणार नाही, परिणामी देशाची प्रगती होणार नाही व देशातील युवकांना रोजगार मिळणार नाही. केवळ पुरेसाच नव्हे तर भरपूर वीजपुरवठा कसा निर्माण करता येईल, याचाही आराखडा त्यांनी तयार केला होता. वीजेच्या संबंधित सर्व क्षेत्र कशी बळकट करून भारताची प्रगती होईल याची दक्षता ते नेहमी घेत. एके ठिकाणी या सर्व बाबींचे समर्थन करताना ते म्हणतात, The broadenning & the electrical industry and the development & hydro eledrical power are inextricably connected with development & industries and food production.” (उद्योगगधंदे वाढविणे आणि अन्नधान्याचे अधिक उत्पादन करणे ह्या दोन्ही गोष्टी वीजेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत.) भारतातील पूरनियंत्रण, कृषी, जलसिंचन, अन्नधान्य पुरवठा या संपूर्ण राष्ट्रीय प्रगतीच्या नाड्या आहेत या नाड्या मजबूत करण्यासाठी ऊर्जा व जलसंपदा या खात्यांनी जोरदार काम केल्याशिवाय देश प्रगती करु शकणार नाही. याचे तत्वतः व वस्तुशः भान देणारे पहिले राष्ट्रहितैषी दृष्टे राष्ट्रपुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत.
देशाला जलसाक्षरता आणि ऊर्जासाक्षरता याचे सत्यवाचक धडे त्यांनी दिले. ७५ वर्षांपूर्वीची त्यांची ही दूरदृष्टी आपण जर गांभीर्याने ओळखली असती तर – (परंतु इतिहासात जर – तर या शब्दाला क्षमा नसते.) ना या देशात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या, ना दूष्काळाने हाहाकार माजविला असता. याविषयी भारताचे ज्येष्ठ जलतज्ञ डॉ. सी. भाभा म्हणतात, “थोड्याशा कालावधीमध्ये आपण नदीच्या खोऱ्याऱ्यांविषयी व तेथील प्रकल्याविषयी घेतलेले निर्णय यामुळे प्रकल्प तयार झाले. त्यामध्ये दामोदर, महानदी, कोसी नदी, सोननदी इत्यादी मोठ – मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. हे बहुउद्द्देशीय आणि प्रादेशिक विकासाचे प्रकल्प ज्यांनी तथार केले, त्या डॉ. बी. आर. आंबेडकरांचे आपण सर्वांनी ऋणी असले पाहिजे. यावरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपणा लक्षात येतो. डॉ. बाबासाहेबांचे हे दृष्टेपण अजून एका बाबतीत सांगा वेसे वाटते की मतदानाचा अधिकार. आपल्या देशातील प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देताना तो निरक्षरांना न देता तो फक्त उच्चभ्रू समाजातील लोकांना द्यावा असा समज किंवा विचार जोर धरत असताना, हा अधिकार सर्वांना मिळावा हा ध्यास डॉ. बाबासाहेबांचा होता. परंतु आज परिस्थती नेमकी उलट आहे. म्हणजे उच्चभ्रू व सुशिक्षित समाज मतदानाची सुट्टी enjoy करतात, परंतु ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी ध्यास घेतला होता की, निरक्षराना मतदानाचा हक्क मिळावा तेच निरक्षर मतदान करण्यासाठी रांगा लावतात. ही परिस्थिती बघितल्यावर मतदान जागरुकता कुणात आहे? असा प्रश्न पडतो.
१९१९ साली मताधिकाराच्या प्रश्नाचा अभ्यास कमिटीसमोर आपले मत मांडताना देशातील २९ वर्षे पूर्ण असणाऱ्या सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, अशी मागणी करणारे डॉ. बाबासाहेब हे देशातील पहिले नेते असावेत. त्यांनी फक्त दलितांपुरतेच न बघता सर्वांचा विचार केला. याचाच अर्थ डॉ. बाबासाहेबांनी सर्व भारतीयांना त्यांचे नाव देशाच्या सातबाऱ्यावर लिहिले. आलेल्या संधीचे सोने करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारंगत होते. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर ते देशबांधवासाठीच करत जेव्हा त्यांना कळून चुकले की, आता इंग्रज देश सोडणार. तेव्हा त्यांनी दलिताचा प्रश्न तेवढ्याच जोरकसपणे मांडला. यावर त्यांना घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी घेण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी आपला ठसा पुन्हा उठवला. व आपल्या उत्तुंग दूरदृष्टीने आजची आपली सर्वांची घटना तयार केली. त्याची दखल स्वतः राजेंद्रप्रसादांनी घेत त्यांचे कौतुक केले.
जीवनातील अनेक जीवघेण्या प्रसंगांचा अनुभव घेत, विद्याभ्यास करताना अर्धपोटी राहणारे, विदयेसाठी अतोनात कष्ट सोसणारे, पाठीशी धनाचे कसलेही पाठबळ नसणारे, कसलाही राजकीय वारसा नसणारे, कोणत्याही कट्टर राजकीय विरोधाला न जुमानता देशातील प्रथम श्रेणीचा पुरुष हा किताब मिळविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अलौकीक आहेत. दलित समाजात जन्मलेले बाबासाहेब पुढे शिक्षणतज्ञ, ग्रंथकार, अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, नेता, कायदेपंडित, कायदे करणारे, घटना लिहिणारे, अस्पृशांची गुलामगिरी नष्ट करणारे, दलित बांधवांचे उध्दारकर्ते, एक दृष्टे राष्ट्रपुरुष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अजरामर ठरले. डॉ. बाबासाहेबांनी जीवनाच्या अखेरपर्यंत अखंड संघर्ष केला. स्वतः दिव्याप्रमाणे जळून समाजाला ते ज्ञानप्रकाश देत राहिले. दलित बांधवावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक वेळी ते नवा लढा देत राहिले. राज्यघटनेच्या माध्यमातून दलित बांधवांसाठी राखीव जागांची तरतूद केली. न्याय, नीती, बुद्धी, शील, करुणा, मैत्रीवर आधारलेला नवसमाज घडविणारा बौद्ध धम्म दिला. गुलामासारखे जीवन जगणा-या एका मोठ्या मानवी समूहाला त्यांनी माणूसकीचे हक्क मिळवून दिले. अशा लोकविलक्षण राष्ट्रहितैषी दृष्ट्या राष्ट्रपुरुषास माझे कोटी – कोटी प्रणाम।

श्री. माधव विश्वनाथ अंकलगे,
मु. पो. वाटद कवठेवाडी,
ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०/ ९०२१७८५८७४.



