नाटे येथे कौटुंबिक कारणातून भाऊ, पुतण्याकडून तरुणाचा खून

राजापूर : दारूच्या नशेत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय इसमाला जीवे ठार मारल्याची घटना काल (१६ मे) नाटे, ठाकरेवाडी येथे घडली आहे. स्वप्नील लहू ठाकरे (४५, रा. नाटे ठाकरेवाडी) असे मृताचे नाव असून त्याच्या भाऊ आणि पुतण्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाटे, ठाकरेवाडी येथील स्वप्नील ठाकरे हे रत्नागिरी येथे वास्तव्याला असून १५ मे रोजी ते आपल्या लहान मुलासह नाटे गावी आले होते. गुरुवारी रात्री त्यांनी त्यांचा मोठा भाऊ चंद्रकांत लहू ठाकरे व पुतण्या अमोल चंद्रकांत ठाकरे यांच्या समवेत मद्यपाशन केले. यावेळी त्या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर या रागातून शुकवारी दुपारी भाऊ चंद्रकांत आणि पुतण्या यांनी पुन्हा ठाकरे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघांनी ठाकरे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठाकरे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील संशयित आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.



