शिर्के प्रशालेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लो.टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी : रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरमध्ये लो.अण्णाभाऊ साठे जयंती आणि लो.टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन १ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात या दोन महान विभूतींच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. औघडे होते. प्रास्तविक श्री. मुडेकर यांनी केले. त्यानंतर प्रत्येक वर्गाने तयार केलेला पुष्पहार लो.टिळक यांच्या प्रतिमेस अर्पण करण्यात आला.
रत्नागिरी नगर पालिकेमार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लहान व मोठ्या गटात प्रथम आलेल्या अनुक्रमे आर्या मोरे (इ. ५ अ) आणि अर्णव हर्डीकर (इ. ७ अ) यांची उत्कृष्ट भाषणे सादर झाली. पुष्पहार तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्या वर्गांना श्री. लिंगायत यांच्यातर्फे रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
प्रमुख वक्त्या सौ. यादव यांनी आपल्या भाषणात लो.टिळकांच्या जीवनातील ठळक प्रसंग मांडले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाजकार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री. औघडे यांनी दोन्ही प्रतिमांना विनम्र अभिवादन करून त्या महान व्यक्तींच्या व्यक्तीमत्त्वातील प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, देशप्रेम आदी गुणांचे वर्णन केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, परीक्षक सौ. धामापूरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अभ्यंकर, तर आभार प्रदर्शन सौ.कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्यसभा व सांस्कृतिकसभा या दोन्ही विभागातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



