निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची व ईव्हीएम बंद करण्याची मागणी

रत्नागिरी : भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून मत चोरी होत असल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश सरचिटणीस रमेश कीर म्हणाले की, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या तिच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एसआयआरच्या नावाखाली गोंधळ सुरू असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर त्यांच्याच सहकाऱ्यांनी वारंवार आक्षेप नोंदवूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.” काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत, हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांनी २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा हा भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या ज्यात महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी. या गोंधळास जबाबदार धरून मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
पारदर्शकता जपण्यासाठी ईव्हीएम ऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला आहे.


