उपक्रमशील शिक्षक अरविंद महाकाळ यांना रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान
मागील अनेक वर्षे शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अरविंद महाकाळ यांना रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : मागील अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देतानाच विद्यार्थी विकास, पालक प्रबोधन आणि शाळा समृद्ध होण्यासाठी शाळेमध्ये विशेष प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफेरी क्रमांक २ चे शिक्षक अरविंद शिवराम महाकाळ यांना नुकताच खेड येथील गणेश सभागृहात रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६ प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. काशीद यांच्या हस्ते आणि राज्याध्यक्ष श्री. बेर्डे, जिल्हाध्यक्ष विपुल देसाई, रत्नागिरी तालुकाध्यक्ष शिरीष लिंगायत यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले.
अरविंद महाकाळ यांनी अध्यापनामध्ये नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करणे, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे यासाठी सातत्याने स्पर्धा परीक्षा, संस्कार वर्ग, संगणक प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा यासह सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेतून अनेक विद्यार्थिनींना लाभ मिळवून दिला आहे. कुटुंब नियोजन करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न करतानाच व्यसनमुक्ती अभियान, जनजागृती कार्यक्रम, सामाजिक प्रबोधन, विविध शिबिरांचे आयोजन, शाळा विकासासाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उठाव करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय असतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नागरिकत्व घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्यासोबतच त्यांनी अनेक वर्षे प्रशासनाच्या आदेशान्वये केंद्रीय प्रमुख पदाचा कार्यभार देखील यशस्वीपणे सांभाळत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच विविध प्रकारे राबवत असलेल्या उपक्रमांमुळे शाळेचा व त्यांच्या कार्याचा लौकिक सर्वदूर पोहोचत आहे. म्हणूनच मागील अनेक वर्ष करत असलेल्या कामाची दखल घेऊन अरविंद महाकाळ यांना नुकताच खेड येथील गणेश सभागृहात रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी सुभाष महाकाळ, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दक्षिण कोकण युवाशक्तीप्रमुख अरुण मोर्ये, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बेंद्रे, यशवंत निंबरे, चंद्रकांत वीर, मुख्याध्यापक सदानंद डिंगणकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सौ. अंजली महाकाळ, साहिल महाकाळ आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
एका उपक्रमशील, निःस्वार्थी आणि प्रामाणिक शिक्षकाला रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६ प्रदान केल्याबद्दल सर्व स्तरातून रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांना धन्यवाद दिले जात असून, अरविंद महाकाळ यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


