सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव (रत्नागिरी) येथे असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. केतन चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “वसंतराव नाईक हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक द्रष्टे नेते होते. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीला आणि शेतकऱ्यांच्या हाताला ओळख दिली. त्यांनी मांडलेले “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे” हे केवळ वाक्य नव्हते, तर त्यांच्या धोरणांचा तो केंद्रबिंदू होता. आज कृषी दिन साजरा करताना आपल्याला हेही समजून घ्यावे लागेल की, बदलत्या काळानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि बाजारपेठेतील आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धित उत्पादने यांकडे वळणे आवश्यक आहे. आजच्या या दिनी, आपण सर्वांनी एक शपथ घेऊया की, ज्या ध्येयाने वसंतराव नाईक यांनी शेती आणि शेतकऱ्यांची सेवा केली, त्याच भावनेने आपणही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करूया आणि महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात अधिक समृद्ध करूया.”
त्यानंतर शासन निर्देशानुसार ‘कृषी सप्ताह’ निमित्त विशेष ‘वृक्षारोपण’ मोहीम राबविण्यात आली. हा कृषी सप्ताह १ ते ७ जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव तसेच पेठकिल्ला येथील प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.
इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन या सेवाभावी संस्थेसोबत संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . इनरव्हील क्लबने सर्व वृक्षरोपे प्रायोजित केली .श्रीमती ऋचा गांधी, श्रीमती सुवर्णा चौधरी, डॉ. प्रियंका कांबळे, श्रद्धा सावंत, प्रज्ञा गांधी, आशा सनगर आणि सोनाली आयरे उपस्थित होत्या. त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रममध्ये सहभाग नोंदविला .
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहयोगी संशोधन अधिकारी प्रा. डॉ. आसिफ पागारकर यांनी समन्वयाचे काम पाहिले. सहाय्यक संशोधन अधिकारी डॉ. मनोज घुघुसकर, अभिरक्षक डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, श्रीमती व्ही. आर. सदावर्ते व वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. ए. एन. सावंत सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी मनिश शिंदे, सचिन पावसकर, सचिन चव्हाण, तेजस जोशी, योगेश पिलणकर, प्रशांत पिलणकर, स्वप्नील आलीम, श्री. पेडणेकर, केतन चव्हाण व अभिजीत मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



