रत्नागिरीत अंगदान जनजागृती रॅलीचे आयोजन

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज (७ ऑगस्ट) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीने अंगदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी अंगदानबाबत उपस्थित नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी, आंतरवासिता डॉक्टर व अधिकारी कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंगदानबाबत जनजागृती करण्यास आवाहन देखील केले. या अंगदान जीवन संजीवनी अभियान रॅलीची सुरुवात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी झेंडा दाखवून केली.

अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथून सुरू होऊन बस स्थानक व बस स्थानकापासून परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे समाप्त झाली. या अंगदान रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी व आंतरवासिता डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रॅली यशस्वी केली.
ही अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. रामा भोसले, अधिसेविका सौ. जयश्री शिरधनकर व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.



