मुख्य बातमी

कोकणातील नऊ विद्यार्थ्यांचा दिल्लीतील राष्ट्रीय कृषी अधिवेशनात सहभाग

रत्नागिरी : कोकण प्रांतातील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या ‘एग्रीव्हिजन–२०२६’ च्या १० व्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभाग घेतला. यात कॉलेज ऑफ फिशरीजमधील तृतीय वर्षाचे विद्यार्थी यश सतीश काळे यांचाही समावेश होता. ‘भारतीय कृषीची पुनर्कल्पना: पारंपरिक ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित रूपांतर’ या विषयावर भारतरत्न चिदंबरम सुब्रमण्यम सभागृह, ICAR-NASC, पुसा, नवी दिल्ली येथे हे नुकतेच हे दोन दिवसांचे निवासी अधिवेशन झाले.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व डेअरी मंत्रालयाच्या सहकार्याने आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशातील २५ राज्यांतील सुमारे ४५० कृषी व संलग्न विद्याशाखांचे विद्यार्थी, वैज्ञानिक आणि उद्योजक या वेदीवर सहभागी झाले.

उद्घाटन सत्रात कृषी अनुसंधान व शिक्षण विभागाचे सचिव तथा ICAR चे महासंचालक डॉ. एम. एल. जट हे उपस्थित होते. त्यांनी भारतीय शेतीला केवळ उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता, बाजार मागणी, विपणन, मूल्यवर्धन आणि शेतकरी नफ्यावर आधारित व्यापक कृषी-अन्न प्रणालीकडे नेण्याचे महत्त्व सांगितले.

या अधिवेशनात संशोधनाची परंपरा ते आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक व ज्ञानाधारित शेती, कृषी सुधारणा, शिक्षण प्रणाली, राष्ट्रीय विद्यार्थी शिष्यवृत्ती (NSP), युवा महोत्सव आणि क्रीडा या विषयांवर सत्रे झाली. कोकणातील विद्यार्थ्यांनी या सत्रांमधून कृषी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील नवीन संधी, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळवली.

दुपारनंतर सामाजिक माध्यमांचा विचार आणि ‘आदर्श व्यक्ती’ (Role Model) या विषयांवर सत्रे झाली. यात डॉ. शिरीष निगम यांनी जीवनातील निर्णायक यशाचे घटक, व्यवसाय कल्पना, उद्योजकता आणि आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. निगम यांनी या अधिवेशनातील आदर्श व्यक्ती सत्रात सहभाग घेतल्याचे नमूद केले आहे.

तसेच बागायत सल्लागार, कलमी भाजीपाला तज्ज्ञ आणि उद्योजक राजीव भास्कर यांनी बागायत, नर्सरी व्यवसाय आणि कृषी उद्योजकतेविषयी माहिती दिली. मधमाशी पालन हा शेतेतर व शेतीपूरक रोजगारनिर्मितीचा महत्त्वाचा मार्ग असल्याचेही अधिवेशनाच्या विषयसूचीत स्पष्ट करण्यात आले होते.

कोकणासाठी महत्त्व

कोकण हा मत्स्यव्यवसाय, बागायत आणि ग्रामोद्योगाशी निगडित असा प्रदेश असल्याने या अधिवेशनातील अनुभव स्थानिक युवांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मासेमारी, मत्स्यपालन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मधमाशी पालन, बागायत आणि सामाजिक माध्यमांद्वारे विपणन यांचा संगम घडवून नवे रोजगारनिर्मितीचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात.

यश काळे यांनी डॉ. एम. एल. जट यांची भेट घेतली व कृषी-मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी संधी आणि आव्हानांविषयी चर्चा केली. पारंपरिक शेतीचे ज्ञान, नैसर्गिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या संगमातून युवा पिढीने ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवे योगदान द्यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!