ब्राह्मण सभेचे कार्य कौतुकास्पद, नेहमीच सोबत राहणार : ओंकार फडके
कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचा वसंतोत्सव उत्साहात

रत्नागिरी : “कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेचे कामकाज चांगल्या रितीने सुरू आहे. ब्राह्मण व्यक्तींना एकत्र ठेवून सर्व समाजाचे हित साधणारी ही संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेला आतापर्यंत जसे सहकार्य केले त्याप्रमाणे कधीही संस्थेच्या मदतीसाठी सदैव सोबत आहे,” असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव तथा भाजपा तालुका सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले.

नाचणे येथे यशवंत हरी गोखले भवनात रविवारी आयोजित कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वसंतोत्सव स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महिलांनी चैत्रगौरी हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाला अध्यक्ष अनंत आगाशे, उपाध्यक्ष रविंद्र इनामदार व सत्कारमूर्ती उपस्थित होते.
या वेळी आशादीप संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर नाचणे येथील नवलाई ग्रुपच्या वतीने जितेंद्र सावंत आणि कामगार नेते लिलाधर भडकमकर यांना सन्मानित केले. या सत्कारमूर्तींनी ब्राह्मण संस्थेने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ब्राह्मण व्यक्तींचे मार्गदर्शन, सहकार्य लाभल्यामुळेच प्रगती करता आली, संस्थेचा हा उपक्रम खूप स्तुत्य व अनुकरणीय आहे, असे आवर्जून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात अनंत आगाशे म्हणाले की, गुढीपाडव्यानिमित्त वसंतोत्सव साजरा करताना आनंद होत आहे. ४०० सभासद व २०० देणगीदारांच्या मदतीने संस्था २२ वर्षे सुरू आहे. संस्थापक परशुराम केळकर, वैशंपायन, मी, नातू काका आदी अनेकजण होते. रत्नागिरीचा विचार करताना वरच्या भागात राहणाऱ्या ब्राह्मण लोकांसाठी ही संस्था चालू केली. सभासद वाढू लागले व एकोपा निर्माण झाला. किशोर नवाथ्ये यांच्या कार्यालयात कार्यक्रम होत होते. यशवंत हरी गोखले यांनी जागा दिल्यामुळे वास्तू निर्माण करता आली. वाचनालय, अभ्यासिका, अभ्यागत निवास, शैक्षणिक वर्गखोल्या आदी सुविधा सहकार्य मिळाल्याशिवाय निर्माण करता येणार नाहीत. त्यामुळे सभासदांचे सहकार्य करावे.
प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनायक देशकुलकर्णी यांनी, सूत्रसंचालन सौ. गौरी जोशी यांनी केले. आभार खजिनदार विलास कुळकर्णी यांनी मानले. कार्यवाह रवींद्र रानडे, सहकार्यवाह प्रसाद पटवर्धन, अदिती भावे यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, महिला मंडळी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. यानंतर गायक अभिषेक काळे व मुग्धा गांवकर यांचा ‘अभंग नाट्यरंग’ कार्यक्रम रंगला.
वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण करणारी दांम्पत्ये, वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थी- स्वानंदी दाते, दुर्वा आगाशे, शौनक गोखले, देवांग पटवर्धन, अनुष्का नानिवडेकर, कौशिकी नवाथ्ये, मुक्ता बापट, रीतिषा माईनकर, ऋचा दंडवते, मैत्रेयी देसाई, ब्रविम देसाई, आरव पुराणिक, स्पृहा पोंक्षे. उल्लेखनीय कार्य- सौ. दीप्ती आगाशे, अनिल देवळे, ओंकार नवाथ्ये, विनायक बापट, सौ. प्राजक्ता दामले, सौ. मधुरा चिंचाळकर, अनिकेत कोनकर, श्रीकृष्ण जोशी, सौ. राधा देवळे. सौ. सौख्यदा वैशंपायन.

