स्वर्ग, मोक्ष, वर्ण नाकारणाऱ्या संतपरंपरेचा मूळ गाभा जाणून घेणे महत्त्वाचे : परुळेकर

सिंधुदुर्गनगरी : संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांसह सर्वच संतांनी स्वर्ग, मोक्ष, वर्णव्यवस्था या संकल्पना नाकारल्या. एका अर्थाने इहवादी असलेल्या संतपरंपरेचा हा गाभा समजून घेणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन निरुपणकार ह.भ.प. (ॲड.) देवदत्त परुळेकर यांनी येथे केले.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मे महिन्याच्या मासिक कार्यक्रमात ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ (संतपरंपरेचे सामाजिक योगदान) या विषयावर ते बोलत होते. ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग पंधरावा मासिक कार्यक्रम होता. ओरोस येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला व्यासपीठाचे समन्वयक सतीश लळीत यांनी श्री. परुळेकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन, तर डॉ. सई लळीत यांच्याहस्ते मंगल परुळेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथील शतकमहोत्सवी ख्यातनाम शिक्षणसंस्था असलेल्या चिकित्सक समुह या संस्थेने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.

श्री. परुळेकर म्हणाले की. ‘संतकृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया’ हा प्रसिद्ध अभंग संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी रचला. ज्ञानोबांना पाया आणि तुकोबांना भागवत धर्माचा कळस म्हणणाऱ्या या अभंगामध्ये संतपरंपरेचे सार आहे. कोणतीही राजकीय क्रांती ही सामाजिक क्रांतीतून जन्म घेते. महाराष्ट्रात विविध संतांनी धर्माची चिकित्सा सुरू केली. धर्माद्वारे होणाऱ्या शोषणाला विरोध केला. धर्मातील शाश्वत नीतिमूल्ये स्वीकारून कर्मकांड आणि शोषण करणाऱ्या प्रथांना विरोध केला आणि एक सामाजिक क्रांती घडवली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्रात जन्मले, याचे कारण संतांनी ही भूमी नांगरुन ठेवली होती, असे न्या. रानडे म्हणाले आहेत. कोणतीही चिकित्सा ही धर्माच्या चिकित्सेतून सुरु होते, असे कार्ल मार्क्स म्हणाला आहे. महाराष्ट्रातील संतांनी एकप्रकारे धर्मचिकित्साच केली. त्याची फळे महाराष्ट्राला मिळाली.
भागवत धर्म हे महाराष्ट्राचे फार मोठे वैशिष्ट्य आहे, असे सांगून ते म्हणाले की, कोणत्याही धर्मात चार गोष्टी असतात. शाश्वत नीतिमूल्ये, मिथके, कर्मकांड आणि शोषण या त्या चार गोष्टी होत. संतांनी या चारही पातळ्यांवर काम केले आणि महाराष्ट्र घडवला. भागवत धर्माने विठोबा हे उपास्य दैवत, वारी आणि नामस्मरण ही उपासनापद्धती, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ स्वीकारुन महाराष्ट्रात विषमतारहित नवी सामाजिक क्रांती घडवली. संत ज्ञानेश्वरांनी याचा पाया घालताना श्रुती-स्मृतींपेक्षा कर्मयोग शिकवणाऱ्या भगवद्गीतेवर भाष्य केले आणि चिद् विलासाची संकल्पना मांडली. समाजातील विशिष्ट वर्गालाच शिकण्याचा, ज्ञानप्राप्तीचा अधिकार होता. तो ज्ञानेश्वरी सर्वांसाठी लिहून त्यांनी सर्वांसाठी उपलब्ध केला. मोक्ष, चार वर्ण, जन्माधिष्ठित उच्चनीचता नाकारली आणि महाराष्ट्रात समतेचे पर्व सुरू केले. संतांची ही सामाजिक कामगिरी समजून घेणे आवश्यक आहे.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष असलेले ॲड. परुळेकर यांनी ‘आम्ही साहित्यप्रेमी’ उपकमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज संपर्कसाधने कितीही प्रगत झाली असली तरी संपर्क कमी झाला आहे. त्यामुळे समोरासमोर येणे खुप महत्वाचे झाले आहे. समाजाची सद्यस्थिती पहाता पुढील काळात हे आवर्जुन करावे लागेल. असे माणसामाणसांना एकत्र आणणारे उपक्रम वाढले पाहिजेत.
सतीश लळीत यांनी श्री. परुळेकर यांचा परिचय करुन दिला. आजची सामाजिक स्थिती पाहता विचार आणि विवेक शिकवणाऱ्या संतपरंपरेचा आशय समजून घेणे आवश्यक आहे. याच हेतूने संतपरंपरेचे सामाजिक योगदान समजावून देणारा हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाला बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, प्रा. ज्योती बुवा- तोरसकर, अनिल रेडकर, सुनील नाईक, सुधीर गोठणकर, पुरुषोत्तम कदम उपस्थित होते. डॉ. सई लळीत यांनी रसिकांचे आणि चिकित्सक समूह, मुंबई यांचे आभार मानले..

