उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरी वाहतूक व्यवस्थापन बैठक संपन्न

रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरातील वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने परिवहन विभाग, पोलीस विभाग व खासगी प्रवासी बस वाहतुकदार यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शहरातील प्रवासी बस थांब्यावर वाहतूक कोंडीची समस्या जास्त उद्भवत असल्याने. यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व खाजगी बस वाहतुकदार यांनी संयुक्त सर्वेक्षण करून सुरक्षित बस थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
या बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा शरद घाग, औदुंबर ट्रॅव्हलचे हरिश्चंद्र चव्हाण, न्यू नॅशनल / श्री स्वामी ट्रॅव्हलचे संदेश निकम, नवलाई ट्रॅव्हल ऋषिकेश कामत तसेच मोटार वाहन निरीक्षक आणि जिल्ह्यातील अन्य ट्रॅव्हल्सेच प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रवासी बसेसमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. सुट्टीच्या हंगामामुळे रत्नागिरी ते मुंबई, पुणे प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ झालेली आहे. याच सोबत शहरामध्ये रस्ते विकासाची कामे देखील चालू आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवत आहेत.
विशेषतः शहरातील प्रवासी बस थांब्यावर ही समस्या जास्त उद्भवत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व खाजगी बस वाहतुकदार यांनी संयुक्त सर्वेक्षण करून सुरक्षित बस थांबे निश्चित करण्यात आले आहेत. या थांब्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात येत आहे. केवळ निश्चित थांब्यावरच बस थांबवावी इतर कुठेही अधे मध्ये बस थांबवता येणार नाही असे निर्देश बस वाहतुकदार यांना देण्यात आले. यासोबतच बस सुटण्याच्या वेळेचे नियोजन करण्यात येणार असून एकाच वेळी सर्व वाहतुकदार यांनी बसेस न सोडता टप्याटप्याने सोडाव्यात अशा सूचना देण्यात आल्या. बस चालकांनी बसेस थांबविताना वाहतुकीचा अंदाज घेऊन योग्यप्रकारे खबरदारी घेऊनच शिस्तीत बस थांबवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या. यासाठी बस चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
बसधारकांनी वाहनाचे सर्व कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र यांच्या वैधतेची तपासणी करावी. तसेच बसमध्ये आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी अशा सूचना देण्यात आल्या. वाहतूक व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सुधारित बस थांब्याची यादी अशी : सध्याचा थांबा रेल्वे स्टेशन कॉर्नर, कुवारबाव स्टॉप-प्रस्तावित थांबा इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर (रेल्वे स्टेशन कॉर्नर जवळ). सध्याचा थांबा सावंत हॉटेल पुढे (टीआरपी)- प्रस्तावित थांबा सुझुकी विघ्नेश्वरा शोरूम समोर. सध्याचा थांबा साळवी स्टॉप-प्रस्तावित थांबा मारूती सुजुकी नेक्शा शोरूम समोर, चिरायु हॉस्पिटल समोर शेड जवळ. सध्याचा थांबा शिवाजीनगर बस स्टॉप एचडीएफसी बँक समोर-प्रस्तावित थांबा लेन्सकार्ट शोरूम जवळ (शिवाजीनगर). सध्याचा थांबा विवेक हॉटेल समोर शिर्के उद्यान जवळ- प्रस्तावित थांबा विवेक हॉटेल समोर शिर्के उद्यान जवळ. सध्याचा थांबा आरडीसीसी बँक समोर बांधकाम भवन जवळ (फक्त शनिवारी)-प्रस्तावित थांबा आरडीसीसी बँक समोर बांधकाम भवन जवळ (फक्त शनिवारी) सध्याचा थांबा रहाटघर बस स्टँड-प्रस्तावित थांबा बस स्टँडच्या वरील बाजूस.


