परशुराम कदम यांची शिवसेनेतून (शिंदे) तडकाफडकी हकालपट्टी

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हातखंबा गटातून बंडखोरी युवा सेना कोकण विस्तारक परशुराम मारुती कदम यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. या कारवाईनंतर युवासेना जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई यांनीही आपल्या पदाचा राजिनामा दिल्यामुळे पक्षातील गटबाजी पुढे आली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने सुयोग नंदकुमार कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, पक्षाचा आदेश डावलून याच गटातून युवा सेनेचे कोकण विस्तारक परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी केवळ अर्जच भरला नाही, तर ते अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहून निवडणूक लढवत आहेत. परशुराम कदम हे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवून पक्ष संघटनेच्या विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आले. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट नमूद केले आहे की, “परशुराम मारुती कदम यांची पक्षविरोधी कृती लक्षात घेता, त्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून मुक्त करण्यात येत असून त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.
“हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वकीयांनीच आव्हान उभे केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, या हकालपट्टीच्या निर्णयामुळे शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा स्पष्ट संदेश दिला आहे. या कारवाईमुळे आता हातखंबा गटातील निवडणुकीच्या गणितात काय बदल होतात आणि मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्यावर कारवाई झाल्यानंतर हातखंबा गटातीलच युवासेनेचे जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी आपल्या पदाचा वैयक्तिक अडचणीमुळे राजिनामा दिला आहे. मात्र राजिनामा दिल्यानंतर त्यांनी कदम यांच्या पत्राचा आधार घेत दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरले आहे. ‘जिल्हाप्रमुखांना टॅग करीत, असेच एका एकाची हाकलपट्टी करा मग गाडीत बसतील एवढेच पदाधिकारी कान भरायला उपयोगी पडतील’ असे म्हणत तुम्ही हकालपट्टी करायच्या आधीच राजिनामा घ्या, असे म्हटले आहे. त्यामुळे कदम यांच्या हकालपट्टी ऐवजी मुन्ना देसाई यांच्या राजिनाम्याची चर्चा अधिक रंगली आहे. गाडीत कान भरणारे नक्की कोण याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या योगेश खांडेकर यांनी उमरोली जिल्हा परिषद गटातून तर कोकरे गटामधून किशोर घाग यांनी पक्षाच्या विरोधात जात बंडखोरी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग म्हणून त्यांच्यावरही हकालपट्टीची कारवाई होणार का असा प्रश्न शिवसैनिकांकडून विचाराला जात आहे.



