मुख्य बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची रत्नागिरी नगरपालिकेवर धडक

शहरातील समस्यांचा वाचला पाढा 

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (२२ ऑगस्ट) शहरातील समस्यांबाबत रत्नागिरी नगरपालिकेवर धडक दिली. शहरातील समस्यांविरोधात आक्रमक होत मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासमोर शहरातील खड्डे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव यांवर प्रश्न उपस्थित केले.

शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पुराव्यानिशी अतिशय दुरवस्थेत भयानक पडलेले खड्ड्यांबाबत नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी शहरातील खड्डे बुजविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले. त्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ खड्डे बुजवून चालणार नाही तर परत पाऊस पडून ते तसेच दुरावस्थेत येऊ नयेत यासाठी आरएमसी करावे, असे सुचविले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी जागेवर गेल्याशिवाय समस्या समजत नाही आणि ती सोडविता येत नाही, असे ठणकविल्यानंतर श्री. गारवे यांनी नगरपालिकेच्या प्रतिनिधींना घटनास्थळी पाठविले. त्यानंतर निरीक्षण करून शहरातील खड्डे आरएमसीने बुजवण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले.

राष्ट्रवादी महिला पदाधिकारी जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. शमीम नाईक, शहर कार्याध्यक्ष सौ. मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सौ.फर्जना मस्तान, सौ.आलिया मजगावकर यांनी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचाउपद्रव होत असल्याची बाब पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिली. हे भटके कुत्रे नागरिक व लहान मुलांवरती जीवघेणे हल्ले करत असून, पालिकेने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करावे व सुप्रीम व हाय कोर्टाच्या आदेशानुसार त्यांचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.

शहरातील समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत जाऊन नियोजनबद्ध मांडलेल्या प्रश्नाबाबत शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सईद पावसकर, फरहान मुल्ला, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष महबूब मोगल, नगरसेवक बबन आंबेकर, जिल्हा युवक सरचिटणीस तालुका मतीन बावानी, रणजीत शिर्के, जिल्हा युवक उपाध्यक्ष नदीम मुजावर, युवकचे फैज सावकार, जुबेर करंबेळकर, कय्युम काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!