अंजणारी घाटात भरधाव ट्रक उलटला; चालकाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील तीव्र उतारावरील अपघात

लांजा : मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लाइडिंगचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक अंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी उलटला. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम सिंग (वय ५८, रा. सुकरताल, उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एचआर ३८ एक्स ०९९३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लाइडिंगचे साहित्य घेऊन जात होते. शुक्रवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास हा ट्रक लांजा तालुक्याच्या हद्दीतील अंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी आला असता, भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक महामार्गावर उलटला. या अपघातात ट्रकचालक श्याम सिंग गंभीर जखमी झाले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.



