मुख्य बातमी

रत्नागिरीत रुग्णवाहिका-दुचाकीचा भीषण अपघात; चौघे गंभीर जखमी

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका आणि दुचाकीमध्ये रत्नागिरी-हातखंबा मुख्य रस्ता आणि कारवांचीवाडी येथून येणाऱ्या फाट्यावर रविवारी (३० नोव्हेंबर) रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघे सदस्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले चालक चेतन मयेकर (रा. वांद्री) हे रुग्णवाहिका (क्र. एमएच-०८-एपी -३८९४) घेऊन, वाहिकेतील नऊ कर्मचाऱ्यांच्या स्टाफसह जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने येत होते. कारवांचीवाडी फाट्याजवळ आल्यावर अचानकपणे दुचाकी (एमएच-०९ जीवाय १५६२) मुख्य रस्त्यावर आली आणि रुग्णवाहिकेच्या पुढच्या बॉनेटला धडकली.

या अपघातामध्ये दुचाकीवरील किरण रामचंद्र नवले (वय ३०), त्यांची पत्नी मयुरी किरण नवले (वय ३०), मुलगा श्रेयस आणि मुलगी श्रद्धा (सर्व राहणार परेल, नीनाई-शाहूवाडी-कोल्हापूर) हे चौघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी श्रेयस आणि दुचाकी चालक किरण यांच्या डोक्याला, तर मयुरी आणि श्रद्धा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर तातडीने या चौघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरा सायंकाळपर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!