पटवर्धन हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल रोजी विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या बहुआयामी कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक संघर्षाची माहिती दिली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला:
श्रीमती श्रद्धा हर्डीकर यांनी हिराकुड प्रकल्प उभारणीतील डॉ. बाबासाहेबांच्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयी माहिती दिली. श्रीमती प्रीती केळकर व श्रीमती प्रज्ञा जाधव यांनी ‘स्त्रीमुक्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आपले विचार मांडले. महिलांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यात बाबासाहेबांचा वाटा किती मोठा होता, हे त्यांनी अधोरेखित केले.
श्रीमती पूनम काटकर यांनी ‘मिलिंद विद्यालयाच्या नावाची कहाणी’ सांगून बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचा इतिहास उलगडला. श्रीमती मानसी चव्हाण यांनी ‘दुसरे महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब’ या ऐतिहासिक संदर्भावर भाष्य करत त्यांच्या मुत्सद्देगिरीची माहिती दिली. दिनेश मोहिते यांनी बाबासाहेबांच्या जलनीतीचा आणि चार प्रमुख जलप्रकल्पांच्या नियोजनाचा विशेष उल्लेख केला. श्रीमती अक्षया भाटकर यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार आणि त्यांची जीवनमूल्ये आपल्या भाषणातून मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राचे महत्त्व पटवून देत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती करावी, असे आवाहन केले.
विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती कल्पना शिरोळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ पालकर यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



