सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केले.
उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सी. पी.राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीचे ४५२ मते मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली.
भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे, एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांकडून मतदान झाले.


