मुख्य बातमीशैक्षणिक

देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कवितांचा रंगला ‘काव्यरंग’

रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे काव्यरंग – एक साहित्यिक साज हा कार्यक्रम रंगला. विद्यार्थ्यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांना याद्वारे एक व्यासपीठ उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून ‘काव्यरंग’ला एक संस्मरणीय साहित्यिक साज चढवला.

वाङ्मय विभागप्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी प्रास्ताविक करताना वाङ्मय विभागाचे वर्षभरातील कामाचे स्वरूप याबाबत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कविता वाचनास सुरवात केली. ज्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील स्वलिखित कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. ‘काव्यरंग’ या कवितांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थी कवींमध्ये उत्कृष्ट कविंना गौरविण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालयातून मराठी विभागामध्ये प्रथम तन्वी विनायक पटवर्धन (प्रथम वर्ष वाणिज्य), द्वितीय शुभांगी शिवाजी पोटे (प्रथम वर्ष कला), इंग्रजी विभागामध्ये प्रथम गौरवी मंदार ओळकर (द्वितीय वर्ष वाणिज्य) तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम श्रध्दा रविंद्र सनगरे (बारावी वाणिज्य), द्वितीय आरती रेवाळे (बारावी विज्ञान), तृतीय ऋतुजा खांडेकर (बारावी, वाणिज्य) विजेते ठरले.

प्रमुख वक्त्या प्रा. सौ. मानसी चव्हाण यांनी साहित्य आणि समाज – प्रतिबिंब की परिवर्तन? या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “साहित्य हे केवळ समाजाचे प्रतिबिंब नसून, ते परिवर्तनाची दिशा देणारे सामर्थ्यवान साधन आहे. विचार आणि संवेदना यांची सांगड घालून लिहिलेली प्रत्येक ओळ समाजात सकारात्मक बदल घडवू शकते.”

या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील व कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड उपस्थित होत्या. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. वसुंधरा जाधव, मराठी विभागप्रमुख प्रा. वीणा कोकजे व हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रियांका कुंभार यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!