पडवे सरपंच मुजीब जांभारकर यांनी केली ग्रामस्थांच्या मागणीची पूर्तता
सौरऊर्जा पथदीप बसवून दिलेला शब्द पाळला

गुहागर : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत पडवेचे सरपंच मुजीब जांभारकर यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पथदीप बसवून दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी गणेशोत्सवाच्या काळात रात्री अंधारामुळे जाण्या-येण्यास होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करत सौर दिव्यांची मागणी केली होती. विशेषतः पडवे मुस्लिम मोहल्ला, बंदर जेटी आदी ठिकाणी वाहतुकीची मोठी गरज असल्याने पथदीपांची आवश्यकता सर्वानुमते मान्य करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच जांभारकर यांनी तातडीने निधीची तरतूद करून या भागांत सौर ऊर्जा पथदीपांची बसवणूक केली. त्यामुळे गावकऱ्यांना रात्री धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तसेच पहाटे बंदर व जेटीवर जाणाऱ्या मच्छीमारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
ग्रामस्थांनी सरपंचांच्या या समयसूचक निर्णयाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. पराग कोळवणकर यांनी “दिलेला शब्द पाळणारे सरपंच कायम ग्रामस्थांच्या सोबत उभे असतात” असे म्हणत सरपंच जांभारकर यांचे आभार मानले.
या वेळी पराग कोळवणकर, बंटी कोळवणकर, दत्ता टक्के, संतोष गडदे, विलास गडदे, सुमेध सुर्वे, ग्रामसेवक सौ. पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, शमा मखजनकर, पोलीस पाटील अनंत गांधी, विनायक भोसले, अमानत जांभारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभा चांगल्या वातावरणात पार पडली. यावेळी सरपंच मुजीब जांभारकर यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.



