आश्रम शाळांतील ५ ते १५ वयोगटांतील बालकांसाठी गोवर-रूबेला लस मोहीम

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समन्वयात ५ ते १५ वयोगटांतील सुमारे २ हजार बालकांना १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत गोवर-रूबेला लस दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील आश्रम शाळा व मदरसा मध्ये गोवर-रूबेला आजार निर्मूलन करण्यासाठी विशेष लसीकरण मोहिमेबाबत नियोजनपर आढावा बैठक घेण्यात आली.

या लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाuचे पथक सक्रीय असणार असून प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी राहणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरसे यामधील बालकांचे गोवर-रूबेला लसीकरण प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
“गोवर-रूबेला लसीकरणाद्वारे १५ टक्के पेक्षा जास्त साध्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या संस्थेतील शिक्षकांनीही सक्रीय सहभाग घेऊन आपल्या शाळेतून १०० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करावे. पालकांनी देखील आपल्या बालकांना गोवर-रूबेला लसीकरणासाठी वंचित राहू नये, याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.



