पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर
तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जूनला व ज्ञानेश्वर महाराज पालखीचे १९ जूनला प्रस्थान

पुणे : यंदाचा वारी सोहळा १८ आणि १९ जूनला सुरू होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जून रोजी सुरू होईल. याच तारखेला पालखी देहूतून प्रस्थान करेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान १८ जून रोजी होईल. पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा ६ जुलैला संपन्न होईल. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पाहिले उभे रिंगण, पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, ठाकुरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, वाखरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे व चौथे गोल रिंगण, इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरे उभे रिंगण होईल.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी आळंदीमधून प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी २० तारखेला आळंदीमधून पालखी निघेल. दुपारचा विसावा संगमवाडी येथे होईल तर भवानी पेठेमध्ये रात्रीचा मुक्काम होईल. २१ रोजी पुण्यात मुक्काम असेल. रविवारी सासवडला मुक्काम तर २४ रोजी जेजुरीमध्ये मुक्काम असेल. पुढे वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असं करत ५ जुलै पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल. ६ तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगरप्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल. पुढे १० जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच असेल.
दि. १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान होईल. रात्रीचा मुक्काम इनामदार साहेब वाडा येथे होईल. दि. १९ रोजी देहूतून पालखी निघेल. ३० जून रोजी आकुर्डी, एच. ए. कॉलनी, कासारवाडी, दापोडी, छत्रपती शिवाजी नगर, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर फर्ग्युसन रोड असे करत रात्रीचा मुक्काम नानापेठ येथील विठ्ठल मंदिरामध्ये होईल. २२ जून रोजी लोणी काळभोर, दि. २३ रोजी यवत तसेच पुढे वरवंड, उडंवडी गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी असे करत ५ जुलै रोजी पालखी पंढरपूमध्ये दाखल होईल. ६ तारखेला आषाढी एकदशीला चंद्रभागा स्नान आणि पांडुरंग दर्शन होईल.



