रत्नागिरीतील उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे

रत्नागिरी : शहरालगत असलेल्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. वाहन चालकांना विशेष करून महिला वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी नगर पालिका आणि शिरगाव ग्रामपंचायत दोघांमध्ये हद्दीवरून सुसंवाद नसल्याचा मोठा फटका या भागातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करूनही रस्ता होत नसल्याने यापुढे कुठल्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय इथल्या लोकांनी घेतला आहे.


पावसाळ्या पूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती; मात्र पावसाळा जाण्याच्या मार्गावर असून देखील नगर पालिका किंवा शिरगाव ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत आहे. खरोखरच हा रस्ता कोणाच्या हद्दीत येतो शिरगाव ग्रामपंचायत की नगरपालिका? या प्रश्नाचे उत्तर अजून पर्यंत मिळालेले नसल्याने लोकांची मोठी अडचण होत आहे. याचा फटका नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिक मतदान न करण्याच्या विचारात आहेत.


या भागातील काही नागरिक स्वतःला लोकप्रतिनिधी समजतात; मात्र आता या भागातील रस्त्यांकडे फिरकूनही बघत नसल्याने लोकांचा पारा चढला आहे. या भागातील नागरिक येत्या निवडणुकीत नगरपालिका अथवा ग्रामपंचायत कोणालाच मतदान न करण्याच्या विचाराधीन आहेत.



