जिल्ह्यात ६ ते ८ जानेवारी दरम्यान बाल महोत्सव

रत्नागिरी : जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव भरविला जातो. हा बाल महोत्सव ६ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आयोजित केला जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या बाल महोत्सवात संस्थाबाह्य (नगर परिषद शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत. या बाल महोत्सवात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४X १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर वक्तृत्व अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.


