शृंगारतळी जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी
मनसेचे सा. बां. उपविभाग गुहागरला निवेदन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग (गुहागर) यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, “जानवळे गावात जाणाऱ्या जानवळे फाटा येथूनचा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी चालवणेही जीवघेणे ठरत आहे. या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाल्याने एसटी बस ही उलटली होती. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. यापुढे या रस्त्याची परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते आणि तसे घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही गुहागर सर्वजनिक बांधकाम उपविभागाची असेल.
या रस्त्याची त्वरित सुधारणा करावी अन्यथ: २६ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर कार्यालयासमोर मनसेतर्फे पोषण छेडण्यात येईल, असा गंभीर इशाराही या निवेदनात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांना देण्यात आली आहे.



