लोककलेच्या समृद्धीसाठी, आवश्यक त्या चांगल्या बदलांसाठी प्रत्येक कलावंत बांधील
कलगीतुरा समन्वय समितीची सभा उत्साहात

चिपळूण : यापुढे “शक्ती तुरा” ऐवजी “कलगीतुरा” असा नामोउल्लेख असणारी प्रचार फलक तयार करावीत आणि तसाच उल्लेख बोलण्यातून सुद्धा व्हावा अशी भूमिका कलगीतुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीच्या सभेत मांडण्यात आली आणि ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. लोककलेच्या समृद्धीसाठी आवश्यक ते चांगले बदल करण्यासाठी आपण प्रत्येक कलावंत सदैव बांधील आहोत आणि राहिले पाहिजे. या सभेमध्ये येणाऱ्या हंगामात सोज्वळ आणि समाजप्रिय कार्यक्रम सादर व्हावेत. शाहिरांनी आपल्या लोककलेची आणि स्वतःची अस्मिता अबाधित ठेवून सादरीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कलगीतुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीची विशेष सभा ८ जून रोजी परशुराम (ता. चिपळूण) येथे समितीचे अध्यक्ष अभयदादा सहस्रबुद्धे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. सभेला समन्वय समितीशी संलग्न मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. उपस्थितांतून सभेला अनुसरून सांगोपांग चर्चा करण्यात आली. कलगीतुरा वैभवशाली परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक शाहिराने आपल्या पारंपरिक चौकटीला छेद न देता आपली कला सादर करून या लोककलेचा लौकिक अधिक वाढेल यादृष्टीने प्रयत्न करणे अभिप्रेत आहे, असा मुद्दा एकमताने मांडण्यात आला. तसेच सभेदरम्यान कलगीतुरा समन्वय समिती व मंडळाची ध्येयधोरणे आपण तंतोतंत पाळू असा लिखित शब्द देऊनही काही शाहीर स्वतःच्याच वचनाला बांधील न राहता कलगीतुरा लोककलेच्या संस्कृतीशी प्रतारणा करताना निदर्शनास येत आहे, त्यांना वारंवार समज देऊनही अपेक्षित बदल दिसत नाही, त्यामुळे संबंधित शाहिरांवर कायम स्वरूपाची व ठोस कारवाई करण्यात यावी, असा निर्णय समन्वय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला.

कलगीतुरा लोककलेला शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी समन्वय समिती व संलग्न सर्व मंडळे तसेच संबंधित पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शासनाने आपल्या पदरात अपेक्षित अनुदान टाकावे यासाठी शासनाला अभिप्रेत असणारी लोककला सादर करणे आवश्यक आहे. पर्यायाने त्यासाठी काही तांत्रिक बदल करण्याची देखील गरज असल्याचे सभे दरम्यान नमूद करण्यात आले. उदाहरणार्थ कलगीतुरा लोककलेचा उगम हा “कलगी – तुरा” या नावाने झाला आहे आणि त्यानुसार स्थापन झालेली आपली मंडळे ही “कलगीतुरा समाज उन्नती मंडळ” या नावानेच नोंदणीकृत आहेत. शासनाच्या निकषानुसार कलगीतुरा याच नावाने या लोककलेचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. आजवर आपण “शक्ती तुरा” अशा आशयाने या लोककलेशी निगडीत जाहिरात करत आलो आहोत; परंतु यापुढे “शक्ती तुरा” ऐवजी “कलगीतुरा” असा नामोउल्लेख असणारी प्रचार फलक तयार करण्यात यावेत आणि तसाच उल्लेख आपल्या बोलण्यातून सुद्धा व्हावा अशी भूमिका आजच्या सभेत मांडण्यात आली आणि ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. या लोककलेच्या समृद्धीसाठी आवश्यक ते चांगले बदल करण्यासाठी आपण प्रत्येक कलावंत सदैव बांधील आहोत आणि राहिले पाहिजे. या सभेमध्ये येणाऱ्या हंगामात सोज्वळ आणि समाजप्रिय कार्यक्रम सादर व्हावेत. शाहिरांनी आपल्या लोककलेची आणि स्वतःची अस्मिता अबाधित ठेवून सादरीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. संबंधित मंडळांनी व घराण्यातील वरिष्ठांनी आपापल्या शाहिरांना सूचना द्याव्यात असेही सुचविण्यात आले असल्याचे कलगीतुरा समन्वय समितीचे सचिव सुधाकर मास्कर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या सभेला समन्वय समितीचे विद्यमान अध्यक्ष अभयदादा सहस्त्रबुद्धे, सचिव सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष चंद्रकांत गोताड, मोहन घडशी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे आदी पदाधिकारी, देवरुख मंडळाचे अध्यक्ष शांताराम मालप आणि पदाधिकारी, चिपळूण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जंगम आणि पदाधिकारी तसेच लांजा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित बहुसंख्येने उपस्थित होते.



