गुहागर येथे ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : कै. सौ. नीला व कै. मधुकाका परचुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परचुरे परिवार व कॅरमप्रेमी मित्र मंडळ गुहागर यांच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने या वर्षातील १० वी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२५ कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह (भंडारी भवन) गुहागर (जि. रत्नागिरी) येथे ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पुरुष एकेरी व महिला एकेरी या गटात होणार आहे. स्पर्धेत विजेत्यांना एक लाखाची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेची पुरुष खुली व महिला एकेरीची प्रवेशिका रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते (९४२२४३३०५५) यांचाकडे ३० ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह द्यावी. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेसाठी स्पर्धा शुल्क ७०० रुपये व महाराष्ट्र राज्य नोंदणी शुल्क १०० रुपये असे आहे. प्रवेशिका देताना खेळाडूने आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, इमेल आय डी, व जन्म तारीख देणे आवश्यक आहे. १८ वर्षांखालील मुले व मुली यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असल्यास त्यांना स्पर्धा शुल्क ३५० रुपये असेल. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला सफेद टी-शर्ट परिधान करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजक प्रदीप परचुरे व कॅरमप्रेमी मित्र मंडळ गुहागर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय अण्णा रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, खजिनदार नितीन लिमये, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.



