मुख्य बातमी

मजगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान

रत्नागिरी : तालुक्यातील माजगाव येथे भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो तंदुरुस्त असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

याबाबत वन विभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी : काल (२३ ऑक्टोबर) मजगाव येथील अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती सकाळी ९.३० च्या सुमारास मजगावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी पाली वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली. त्यांनी तात्काळ परिक्षेत्र  वन अधिकारी यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर वन विभागाची टीम रेस्क्यू टीम, पिंजरा व आवश्यक त्या साहित्यासह घटनास्थळी पोचली. आंबा बागेत असलेली ही विहीर सुमारे २५ फूट असून, पाण्याची पातळी ८ फुटांवर होती. विहिरीत पडलेला बिबट्या दगडावर पाण्यात बसलेला दिसून आला.

त्यानंतर तात्काळ जाळीचे नेट विहिरीच्या सभोवार टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली. त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला व पंधरा मिनिटांच्या आतच बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात घेण्यात आले. त्यानंतर मालगुंडचे (ता. रत्नागिरी) पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय  तपासणी करून घेतली. तो सुरक्षित असल्याचे  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा बिबट्या नर जातीचा असून, तो सुमारे ६ ते ७ वर्षे वयाचा आहे. या विहिरीवर शेडनेट टाकलेले असून, भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज  स्थानिक परिस्थितीनुसार काढण्यात आला.

ही रेस्क्यूची कार्यवाही रत्नागिरी चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनपाल (लांजा) सारीक फकीर, वनरक्षक (रत्नागिरी) विराज संसारे, वनरक्षक (जाकादेवी) शर्वरी कदम, प्राणी मित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, तसेच पोलीस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, दिवे गावचे सरपंच फैय्याज मुकादम, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर, तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय  वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!