त्रिभाषा धोरण निश्चिती समिती ३१ ऑक्टोबर रोजी साधणार संवाद

रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्रिभाषा धोरण निश्चिती समिती ३१ ऑक्टोबर रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी व त्यांची याबाबत मते जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
नागरिकांकरिता आपली मते/विचार व्यक्त करण्याची सुविधा समितीच्या https://tribhashasamiti.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्रिभाषा धोरण निश्चिती समितीमध्ये पुढील समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे असून सदस्य, भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ, पुणे डॉ. अपर्णा मॉरिस, भाषा विज्ञान प्रमुख डेक्कन कॉलेज सोनल कुलकर्णी जोशी, शिक्षणतज्ज्ञ छत्रपती संभाजीनगर डॉ. मधुश्री सावजी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा, मुंबई संजय यादव हे सदस्य सचिव आहेत.



