सरस प्रदर्शनमधून पाच दिवसांत ६३ लाखांची उलाढाल

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीमधून पाच दिवसांत ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची विक्री झाली. यामध्ये ५० लाख ४० हजार ६८ रुपये किंमतीची उत्पादन विक्री, तर १३ लाख ११ हजार ९०५ रुपयांची खाद्य विक्री स्टॉलवरून झाली आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाननाची अंमलबजावणी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी संस्थीय बांधणी व क्षमता बांधणी निरंतर सुरू आहे. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांची उपजीविका शाश्वत आणि बळकट होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजरपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रादेशिक, विभाग व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन भरवले जाते.
सन २०२५-२६ चे रत्नागिरी जिल्ह्याचे सरस प्रदर्शन व विक्रीचे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषदेची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित केले होते.
सरस प्रदर्शनाला वाढणारा प्रतिसाद बघून यावेळी ८३ स्टॉलची बांधणी करण्यात आली होती. यामध्ये ६४ उत्पादने स्टॉल व १९ फूड स्टॉल समूहांना उपलब्ध करून देण्यात आले.
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. या प्रदर्शनामध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी आदी), विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले), पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे, ओव्याचे आदी), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद), कोकम, आगळ, कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप), रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी), जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय), मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले.
प्रदर्शन कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले. यामध्ये प्रभाग संघातील महिला, अधिकारी, कर्मचारी तसेच गणपतीपुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांनीही सहभाग घेतला. त्याचप्रमाणे पाककला स्पर्धा गोड व तिखट पदार्थ, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट विक्री – उत्पादने, उत्कृष्ट विक्री फूड स्टॉल यासाठीही स्पर्धा घेण्यात आल्या.
पाककला स्पर्धा गोड पदार्थमध्ये अर्चना संतोष साळवी, अस्मिता बिपीन तोडणकर, प्रियांका नीलेश बहुतुले यांनी अनुक्रमे प्रथम तीन, तर पाककला तिखटमध्ये पायल प्रशांत कदम, स्वरा वैभव देसाई, आणि रवीना कल्पेश गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
उत्कृष्ट मांडणीमध्ये धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता समूहाला प्रथम, सृष्टी स्वयंसहाय्यता समूहाला द्वितीय, तर नारीशक्ती स्वयंसहाय्यता समूहाला तृतीय क्रमांक मिळाला. श्रेय महिला उत्पादक गटाला उत्तेजनार्थ पारीतोषिक देण्यात आले.
उत्कृष्ट विक्री उत्पादनमध्ये भक्ती स्वयंसहाय्यता समूहाला प्रथम, कोकण कलश महिला शेतकरी उत्पादक कंपनीला द्वितीय, तर उद्योगरत्न महिला प्रभागसंघाला तृतीय क्रमांक देण्यात आला.
उत्कृष्ट विक्री – फूड स्टॉलमध्ये संकल्प स्वयंसहाय्यता समूहाला प्रथम, धनज्योती महिला प्रभागसंघाला द्वितीय आणि भरारी स्वयंसहाय्यता समूहाला तृतीय क्रमांक मिळाला.



