‘मनसे’चे अद्वैत कुलकर्णी यांचा ‘भाजपा’मध्ये प्रवेश

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) रत्नागिरीचे माजी शहर अध्यक्ष अद्वैत सतीश कुलकर्णी यांनी आज (५ नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टी पक्षाचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार सूर्यकांत दळवी, विनय नातू आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी खेड येथे पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अद्वैत कुलकर्णी हे राज ठाकरेंचे रत्नागिरीतील निकटवर्तीय मानले जात होते. त्यांनी ‘मनसे’मध्ये असताना रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती, त्यांच्या काळात मनसेने शहरातील समस्यांबाबत अनेक आंदोलन देखील केली होती. त्यांच्या शहर अध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी पक्षाची ठाम भूमिका बजावून विरोधकांना घाम फोडला होता.
एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे. रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता भाजप त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


