चिंद्रवळे गावच्या पहिल्या शिक्षिका शैलजा सुर्वे यांचे निधन

आबलोली (संदेश कदम) : बौद्धजन सहकारी संघ, तालुका गुहागर शाखा क्रमांक ५५, चिंद्रवळे संघटनेच्या अंतर्गत रमाई महिला मंडळाच्या (चिंद्रवळे) माजी सचिव, माजी अध्यक्षा आणि जेष्ठ सल्लागार तसेच चिंद्रवळे गावच्या पहिल्या शिक्षिका शैलजा हरिश्चंद्र सुर्वे यांचे २४ मार्च रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रम गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे (बौद्धवाडी) येथे दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
ज्या काळात ग्रामीण भागात स्त्रिया चूल व मूल सांभाळत होत्या. त्या काळात अनेक संकटावर मात करून प्रापंचिक जबाबदारीतून वाट काढत त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त मुख्याध्यापक आणि लोकप्रिय भूगर्भजल संशोधक स्मृतीशेष हरिश्चंद्र सुर्वे यांनी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. पुढे त्या सलपेवाडी (चिंद्रवळे) येथील बालवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. गावातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून सलपेवाडीने त्यांना सावित्रीबाई फुले या नावानी सन्मानित केले. आजही त्यांना गावच्या सावित्रीबाई फुले म्हणून संबोधले जाते. त्यांनी मुलांना दिलेले संस्कार आणि प्रेम आजच्या स्थानिक युवावर्गाला दिशादर्शक ठरले आहे.
इतकेच नव्हे, तर गावासाठी, शाळेसाठी, शिक्षणासाठी आणि सार्वजनिक सेवेसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेले योगदान बहुचर्चित आहे. सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासताना निवृत्ती वेतनातून गरजूंना, ग्रामीण उपक्रमांना मदत आणि स्थानिक बुद्ध विहाराला देणगी स्वरूपात हातभार दिला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य पुढे प्रवाहीत राहावे यासाठी त्या कार्यरत होत्या. गेली पंधरा वर्ष त्या बौद्धजन सहकारी संघ, तालुका गुहागर, शाखा क्रमांक ५५ या संघटनेच्या अंतर्गत माता रमाई महिला मंडळाच्या माजी सचिव, माजी अध्यक्षा आणि सल्लागार, मार्गदर्शक होत्या.
स्मृतीशेष शैलजा हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, जावई,सुना व उच्चशिक्षित नातवंडे असा परिवार आहे.


