मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या कारला खेड जवळ भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू
जगबुडी नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. येथील जगबुडी नदीच्या पुलावरून कार थेट १०० फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते; मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत.
सोमवारी पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कार जगबुडी नदीवरून जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती १०० ते १५० फूट खाली कोसळली. कार जोरात खाली आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत कारचा चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (२२), मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९) आणि श्रेयस राजेंद्र सावंत (२३) यांचा समावेश आहे. तर परमेश पराडकर आणि विवेक मोरे यांना उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे.


