आबलोली ग्रामसभेत नितीन कोल्हापुरे यांचे पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेवर मार्गदर्शन

आबलोली (संदेश कदम) : राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ग्रामसभेला मार्गदर्शन करण्यासाठी अरिहंत सर्व्हिसेसचे (सावर्डे) नितीन कोल्हापुरे उपस्थित होते.
श्री. कोल्हापुरे यांनी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आपण घरचे लाईट बिल घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून कसे शून्य करू शकतो, तसेच यातून पैशांची बचत कशी होईल व हे पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून आपल्याला किती अर्थसाह्य केले जाते यांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, तलाठी विनोद जोशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. वृषाली वैद्य, ऋषिकेश बाईत, श्रीमती नम्रता निमुणकर, सौ. पायल गोणबरे,सौ. रूपाली कदम, संजय कदम, बचत गटाच्या सीआरपी सौ. मीनल कदम, अंगणवाडी सेविका सौ. रिया रेपाळ, सौ. प्रिया कदम, सौ. मैथिली भाटकर, सौ. सानिध्या रेपाळ, आशा सेविका सौ. विशाखा कदम, ग्रामस्थ अनंत पागडे, दत्ताराम कदम, कृष्णा उकार्डे, सुमित पवार आदी उपस्थित होते.


